अक्कलकोट

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध देवस्थान आहे. स्वामी समर्थ यांचे मंदीर येथे असून अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ आहे.

धार्मिक महत्व

अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर, त्यांचा गावातील मठ प्रसिद्ध आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे.अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आशियाखंडातील सर्वात मोठे(?) असलेले शस्त्रागृह. इथे सर्व जुने परंपरागत शस्त्रांचा साठा येथील भोसले राजगृहाने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळे खड्ग, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुर्‍हाडी, बंदुका, खंजीर इत्यादी इत्यादींचे वैविध्याने नटलेले प्रदर्शन पाहून मन हरखून जाते.

येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रह मनाला मोहवितो. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे मनाला भुरळ पाडतात. त्यानंतर शिवपुरीचे दर्शन मनाला वेगळीच दिशा देते. तेथे हवन, यज्ञ आणि सकाळ-सांयकाळी पौरोहित्याचे महत्त्व पटवण्यात येते.

अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत.

अक्कलकोट संस्थान

अठराव्या व एकोणिसाव्या शतकात अक्कलकोट हे वेगळे संस्थान होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलात पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान नॉन-सॅल्यूट स्टेट या प्रकारांत मोडायचे.

श्री.स्वामी समर्थ,अक्कलकोट

स्वामी समर्थांचे अक्कलकोटला बावीस वर्ष वास्तव्य होते.अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असून सोलापूर जिल्ह्यात येते.सन १८५६ साली स्वामी समर्थांचे अक्कलकोटला आगमन झाले.तर सन १८७८ साली त्यांनी अक्कलकोटला समाधी घेतली.श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत.महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक चमत्कार केले.''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे स्वामींचे भक्तांना अभिवचन होते.
स्वामी समर्थांच्या बावीस वर्षांच्या सहवासाने पवित्र झालेली भूमी म्हणजे अक्कलकोट. हीच पूर्वीची प्रज्ञापुरी. सोलापूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर हे पवित्र तीर्थस्थान आहे. हे संस्थान पूर्वी 121 गावांचे होते. आठव्या शतकात शिलाहार राजे, बाराव्या शतकात चालुक्‍य, त्यानंतर निजामशाही, औरंगजेब अशा अनेक शाह्यांनी येथे राज्य केले. छत्रपती शाहूंनी पुढे हा मुलूख जिंकून घेतला आणि या विभागाची सुभेदारी फत्तेसिंह भोसले यांच्याकडे दिली. या भागात पूर्वी खोकल्यावर गुणकारी अशी अक्कलकाढा वनस्पती मिळायची. येथे भुईकोट किल्लाही होता. अक्कलकोट आणि भुईकोट या संयोगातून अक्कलकोट हे नाव पुढे प्रचलित झाले.

अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिराच्या मागे असणारे भव्य मंदिर म्हणजे स्वामी मंदिर. "भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे' असे भक्तांना शाश्‍वत आशीर्वचन देणारी श्रीगुरुरायांची संगमरवरी मूर्ती येथे आहे. समोर महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस स्वामींचे विश्रांतिस्थान आहे. येथे स्वामीजींच्या वापरातील माच्या, गादी, गुडगुडी आणि पादुका जपून ठेवल्या आहेत. स्वामीजींच्या पालखी सोहळ्याचे महत्त्व वेगळे आहे. कारण ही पालखी फक्त मंदिराजवळ घुटमळत नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम खेड्यापाड्यांत पोचली आहे. पालखी म्हणजे स्वामींची विचारधारा आणि भक्तांनी ती खांद्यावर घेतली आहे, असा व्यापक विचार त्यामागे आहे.

गुलबर्गा, कल्याण, बिदर या जिल्ह्यांचा त्रिकोणी भाग म्हणजे मणिचूल पर्वत. त्यालाच मणिगिरी म्हणतात. लिंगायत पंथातले संस्थापक श्री बसवेश्‍वर याच भागातले. माणिकनगर परिसरातील माणिकप्रभूंची समाधी आहे. मागे सुंदर दत्तमंदिर आहे. काळ्या दगडात हे मंदिर असून पुढे मोठा मंडप आहे.
संपूर्ण भारतात दत्त क्षेत्राचे संशोधन करून दत्तभक्तीचा महिमा वर्धिष्णू करणारे परमपुरुष म्हणजे वासुदेवानंद सरस्वती. त्यांनाच आपण टेंभेस्वामी म्हणतो. स्वामींनी दत्तक्षेत्रे उभारली. त्यांनीच माणगाव येथे दत्तमंदिर बांधले. सावंतवाडीजवळच हे छोटसे गाव आहे. येथे स्वामींचे स्मृतिमंदिरही आहे.

 


solapur pune pravasi sangatana