‘डी-रेल’मुळे प्रवाशांचे ‘मेगा’ हाल

15/07/2010 14:10

‘डी-रेल’मुळे प्रवाशांचे ‘मेगा’ हाल

मुंबई, ११ जुलै / प्रतिनिधी
विरारहून चर्चगेटकडे निघालेल्या जलद लोकलचा एक डबा आज दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास माहीम स्थानकाजवळ रुळांवरून घसरला. या दूर्घटनेत सुदैवाने कोणीही प्रवासी जखमी झाला नसला, तरी पश्चिम रेल्वेची उपनगरी वाहतूक जवळपास पूर्णत: ठप्प झाली. जम्बो ब्लॉकमुळे आधीच विस्कळीत असलेली उपनगरी वाहतूक या दुर्घटनेमुळे पूर्णत: कोलमडल्याने प्रवाशांचे मात्र ‘मेगा’ हाल झाले. माहीम स्थानकाजवळ चर्चगेटच्या दिशेला असलेल्या ‘क्रॉस ओव्हर’च्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. माहीम-मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर जम्बो ब्लॉक असल्याने सदर लोकल अप जलद मार्गावरून अप धीम्या मार्गावर नेण्यात येत होती. या नव्या एमयूटीपी लोकलच्या पहिल्या डब्याची तीन चाके रुळांवरून घसरली. त्यामुळे डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक वगळता उर्वरित उपनगरी रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
अपघातग्रस्त लोकलचा वेग मर्यादित असल्याने सुदैवाने या अपघातात लोकलमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या उपनगरी वाहतुकीचे पूर्णत: तीनतेरा वाजले. अपघातानंतर ३ वाजून ५० मिनिटांनी अप धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. तोवर चारही मार्गावरील वाहतूक ठप्प होती. रेल्वेमार्गावर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. त्यांच्यामध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांसमोर रेल्वेमार्गातून ठेचकाळत पुढील स्थानक गाठण्याखेरीज कोणताही मार्ग उरला नव्हता.
संध्याकाळी पावणेपाच वाजता लोकलचा दुर्घटनाग्रस्त डबा पुन्हा रुळांवर चढविण्यात यश आले. लोकलचे उर्वरित अकरा डबे त्याआधीच रेल्वेमार्गावरून हलविण्यात आले होते. संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास चारही मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली, तरी रात्री उशिरापर्यंत पश्चिम रेल्वेच्या लोकल १५-२० मिनिटे विलंबाने धावत होत्या. दरम्यान, या दुर्घटनेमागील निश्चित कारणांचा शोध घेण्यासाठी खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.     


solapur pune pravasi sangatana