हार्बर रेल्वे सुटली, चाकरमानी 'सुटला'

08/11/2011 17:55
वी मुंबईहून मुंबई-ठाण्याच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांना आज सकाळी हार्बर रेल्वेनं चांगलाच दगा दिला. सकाळी साडेसहाच्या सुमारास, सी-वुड ते बेलापूरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं दोन्ही मार्गांवरची वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. आता ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

तीन दिवसांचा विकेण्ड एन्जॉय करून आज नवी मुंबईकर मंडळी नव्या दमानं ऑफिसला निघाली. पण स्टेशनवर पोहोचताच त्यांचा साफ हिरमोड झाला. सी-वुड ते बेलापूर मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यानं मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी वाहतूक ठप्प असल्याची घोषणा त्यांच्या कानी पडली आणि लेट मार्क च्या काळजीनं चाकरमान्यांचे चेहरेही पडले. काही मंडळी रिक्षा, बस पकडण्यासाठी धावली, तर काहींनी घरचा रस्ताही धरला. हार्बर रेल्वे प्रशासनानं ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेतलं होतं, पण ते किती वेळ चालेल याबद्दल अनिश्चितताच होती.

अखेर, दीड तासांच्या शर्थीनंतर तुटलेली ओव्हरहेड वायर पुन्हा जोडण्यात तंत्रज्ञांना यश आलं आणि वाशी-बेलापूरदरम्यानची वाहतूक हळूहळू सुरू झाली. अजूनही ही वाहतूक संथ गतीनेच सुरू आहे. हार्बर रेल्वेच्या लोकल १५ ते २० मिनिटं उशिरानं धावत आहेत. परंतु, ऑफिसला अगदीच दांडी होण्यापेक्षा लेट मार्क बरा, असा विचार करून चाकरमान्यांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.

solapur pune pravasi sangatana