सोलापूर-जळगाव मार्ग ठरणार मराठवाड्याचा विकासमार्ग

25/04/2011 14:31

सोलापूर - सोलापूर-जळगाव हा 4400 किलोमीटर रेल्वेमार्गाचा सर्व्हे करण्याला रेल्वे बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आता या मार्गाच्या सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले असल्याने मराठवाड्याचा विकासमार्ग ठरणाऱ्या या प्रकल्प पूर्णत्वावर मोठ्या आशा केंद्रीत झाल्या आहेत. सोलापूर ते जळगाव हा मार्ग मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राचा जणू विकासमार्गच ठरणार आहे.

विकासाची दिशा
सोलापूर- बीड-जळगाव रेल्वेमार्ग उस्मानाबाद, बीड तसेच औरंगाबाद या जिल्ह्याच्या भविष्याची नांदी ठरणार आहे. या नियोजित रेल्वेमार्गामुळे लाखो भाविकांची तीर्थक्षेत्रे व भक्तिपीठे जोडली जाणार आहे. त्याचबरोबर नगर-बीड-परळी हा पूर्व-पश्‍चिम रेल्वेमार्ग व सोलापूर-बीड-जळगाव हा दक्षिण-उत्तर रेल्वेमार्ग झाल्यास बीड हे तर भारतातील एक प्रमुख जंक्‍शन बनणार आहे. याचबरोबर उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासालाही आणखी गती प्राप्त होणार आहे. मध्य महाराष्ट्राच्या विकासात भर पडेलच त्याचबरोबर या मार्गावरील सर्वच शहरांचा विकासास गती प्राप्त होण्यासही मोठी मदत मिळणार आहे. पैठण हे ऐतिहासिक व धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राचे शहर रेल्वेमार्गाला जोडले जाईल, अजिंठा वेरुळ या येथील पर्यटनास खूप मोठी चालना मिळेल. त्याचबरोबर उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या कृषीमालाला योग्य बाजारपेठेपर्यंत जाण्याचा आणखी एक मार्ग यामुळे खुला होईल अशी अपेक्षा आहे. हा मार्ग सध्या जरी सर्वेक्षणाच्या पातळीवर असला तरी येत्या चार वर्षांत या मार्गाची उभारणी होण्याच्या दृष्टीने सर्वच स्तरातून पाठपुरावा करण्याचीही गरज आहे.

पाठपुरावा करणे महत्त्वाचे - वर्मा
सोलापूर तुळजापूर, उस्मानाबाद बीड गेवराई पैठण, औरंगाबाद, अजिंठा जळगाव हा सुमारे 400 किलोमीटरच्या मार्गाचे सर्वेक्षण करण्यास मान्यता मिळाल्याप्रमाणे याचे कामही सुरू करण्यात आले आहे. पुढील चार वर्षांत रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी मराठवाडा रेल्वे विकास समितीतर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात येईलच, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी दिली.

जमीन संपादनाचे काम गतीने
गेल्या 40 वर्षांपासून मराठवाडा भागातील हा रेल्वेमार्ग होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा होतो आहे. याला आता मूर्त स्वरूप प्राप्त होईल अशी आशा आहे. या मार्गावरील नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम मात्र प्रगतिपथावर आहे. यातील सुमारे 15 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून 80 टक्के मातीकाम आणि त्याचबरोबर अनेक पुलांचीही कामे पूर्णत्वास येत आहेत. पुढील 50 किलोमीटर मार्गावर येणाऱ्या पूल पूर्णत्वासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.

अंजनडोह आष्टी पर्यंत भूसंपादन
या मार्गावरील नारायण डोह ते आष्टीपर्यंत भूसंपादन करण्यात आले आहेत. या मार्गावरील मातीकामासाठीही निविदा काढण्यात आल्या असून पुढील मार्गावर येणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाचे कामही हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या मुंबई येथील मुख्य प्रशासकीय कार्यालय (बांधकाम) विभागातील अधिकाऱ्यांनी दिली, अशी माहिती श्री. वर्मा यांनी दिली.

मालेगाव - धुळे - इंदोरचा प्रस्ताव
मालेगाव धुळे इंदोर या 399 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा सर्वेक्षणाचा अहवाल जुलै 2009 मध्ये रेल्वे बोर्डाकडे दाखल करण्यात आला आहे. तसेच या मार्गासाठी 1750 कोटी 93 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचा प्रोजेक्‍ट रिर्पोटदेखील बोर्डाकडे दाखल झाला आहे. मात्र या कामास रेल्वे बोर्डाने अद्याप मान्यता दिली नाही. मात्र मध्य महाराष्ट्राच्या विकासासाठी हा मार्गही होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

रेल्वेमार्ग मध्य महाराष्ट्रासाठी फायदेशीर
सोलापूर ते मधल्या मार्गे दिल्ली तसेच कन्याकुमारी इतका विस्तृत मार्ग या प्रकल्पामुळे जोडला जाईल. त्यासाठी जळगाव - सोलापूर हाच मार्ग योग्य ठरणार आहे. उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्याच्या दळणवळण आणि अन्य बाबींसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा मार्ग दिल्लीपासून मधल्यामार्गे कन्याकुमारीपर्यंत जाणारा आहे. देशाच्या नकाशावर बीड जिल्हा तर भौगोलिकदृष्ट्या मध्यस्थानी आहे. या मार्गामुळे बऱ्याच भागात दळणवळणाच्या सुविधा तसेच औद्योगिक विकास होऊ शकेल. शिवाय वाहतूक खर्चातही बचत होणार आहे.

पर्यटनस्थळे व शक्‍तीपीठे जोडली जाणार
अजिंठा आणि वेरूळ लेणी देशात नव्हे, तर जगात प्रख्यात आहेत. पण तेथे पोचण्यासाठी सध्या रेल्वे उपलब्ध नाही. औरंगाबाद किंवा जळगावला उतरून सडक मार्गाने अजिंठ्याला जावे लागते. डेक्कन ओडिसी ही पर्यटक रेल्वे तर औरंगाबाद स्थानकावर दोन दिवस मुक्काम करून प्रवाशांना बसने नेऊन आणते. औरंगाबाद - जळगाव रेल्वेमार्गाने वेरूळ, दौलताबाद, अजिंठा ही स्थळे जोडली जावीत. याच मार्गावर तुळजापूर हे एक शक्तिपीठ, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद ही जिल्हा मुख्यालये, अजिंठा हे पर्यटनस्थळ तर पैठण हे महाराष्ट्राचे गौरवस्थान जोडली जातील आणि मध्य महाराष्ट्राच्या विकासाची गाडी धावू लागेल. हे स्वप्न लवकरात लवकर वास्तवात आणण्यासाठीच अधिक पाठपुराव्याची व निधी उपलब्धतेची गरज आहे, राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाल्यास हेही स्वप्न लवकरच वास्तवात येईल, अशी आशा करण्यास हरकत नाही.


solapur pune pravasi sangatana