लातूर-कुर्डुवाडी पॅसेंजर गाडीचा प्रस्ताव

08/11/2011 18:14
उस्मानाबाद - पंढरीतून थेट शिर्डीला जाण्याची सोय होणार आहे. पुणे-मुंबईला जाणार्‍या प्रवाशांचा रेल्वे वाहतुकीवर वाढता ताण आहे. ’ सिद्धेश्‍वर एक्स्प्रेस’ ला वाढीव ३ कोच, याबरोबरच उस्मानाबादकरांसाठी लातूर-कुर्डुवाडी आणि तेथून कुर्डुवाडी -मिरज अशा दोन नवीन पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे बोर्डाकडे पाठवू, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली.
सोलापूर रेल्वे विभागाने प्रवाशांची मागणी व रेल्वेच्या विस्तारित जाळ्याला सोलापूर स्थानकाला अधिक घट्ट विणण्यासाठी नव्या ७ रेल्वे गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे बोर्डाकडे पाठविलेला आहे. याशिवाय दोन पॅसेंजर गाड्यांची मागणी केलेली आहे. काही गाड्यांच्या मार्गाचे विस्तारीकरण, काही रेल्वे मार्गात बदल तर काही गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे. विठ्ठलाच्या पंढरीतून थेट शिर्डीला ये-जा करण्यासाठी स्वतंत्र शिर्डी-पंढरपूर अशी रेल्वे गाडी रेल्वे बोर्डाने मंजूर केली आहे. सोलापूर-मुंबई सिद्धेश्‍वर एक्स्प्रेस गाडीला १८ ऐवजी २१ कोच लावावेत. सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसला आगाऊ दोन कोच जोडावेत, अशी मागणी केलेली आहे.
सोलापूर-नागपूर, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-पुणे, लातूर-हैदराबाद, सोलापूर-जयपूर, म्हैसूर-शिर्डी, विशाखापट्टणम-शिर्डी अशा नव्याने ७ गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविलेला आहे. लातूर-मिरज मार्गावर पॅसेंजर गाडीची गरज ओळखून लातूर-कुर्डुवाडी,, मिरज-कुर्डुवाडी अशा दोन पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात. पंढरपूर-मुंबई ही आठवड्यातून तीन दिवस असलेली गाडी दररोज करावी. विजापूर-मुंबई ही आठवड्यातून चार दिवस असलेली गाडी दररोज करावी. हैदराबाद-पुणे ही आठवड्यातून तीन दिवस असलेली गाडी दररोज करावी. पुणे-नांदेड ही आठवड्यातून एकदा असलेली गाडी आठवड्यातून तीन दिवस करावी, असा प्रस्ताव पाठविलेला आहे.
पुणे-मनमाड ही गाडी पुणे-इगतपुरीपर्यंत विस्तारित करावी. हैदराबाद-गुलबर्गा ही गाडी पुढे सोलापूरपर्यंत विस्तारित करावी. यशवंतपूर-बागलकोट ही गाडी पंढरपूरपर्यंत विस्तारित करावी. कर्नाटक संपर्क क्रांती म्हैसूर-दिल्ली या गाडीचा मार्ग मिरजऐवजी व्हाया सोलापूर असा बदलावा.
कोजागिरी पौर्णिमेच्या काळात प्रवाशांना टपावर बसवून रेल्वे वाहतूक करण्यात रेल्वेची गंभीर चूक झाली आहे. परंतु नियमबाह्य प्रवास करू नये, याची जबाबदारीही प्रवाशांची आहे. भविष्यात असा प्रकार होणार नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. लातूरहून उस्मानाबादमार्गे मुंबईकडे जाणार्‍या रेल्वेला प्रचंड गर्दीअसते.त्यामुळे या मार्गावर मुंबईसाठी आणखी एक गाडी वाढविण्याची आवश्यकता आहे.सध्या कुर्डुवाडीच्या पुढे रेल्वे गाड्यांची संख्या अधिक असल्याने रूट मिळण्यास अडचण येते.मात्र तरीही यातून मार्गकाढण्यात येईल.याबाबत रेल्वेच्या व्यवस्थापकांशी चर्चाही झाली आहे.याबरोबरच लातूर-मिरज मार्गावर पॅसेंजर गाडीची आवश्यकता आहे.यासाठीचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठविण्यात आला आहे.
-खा.डॉ.पद्मसिंह पाटील
सदस्य, रेल्वे स्थायी समिती

तिकिटाला आगाऊ पैसे घेतल्यास कळवा..
रेल्वे तिकिटासाठी एजन्सीजची नियुक्ती केलेली आहे. स्लीपर कोचच्या एका तिकिटासाठी केवळ १० रुपये व वातानुकूलित कोचच्या तिकिटासाठी ३० रुपये इतकीच तिकीट रक्कम वगळता एजन्सीजला आकारणी करता येते. कोणत्याही एजन्सीजने ई-तिकिटासाठी अधिकचे पैसे घेतले तर रेल्वे वाणिज्य विभागाला दूरध्वनीवरूनही माहिती देता येईल, असे सुशील गायकवाड यांनी सांगितले.

solapur pune pravasi sangatana