रेल्वेत अतिरेकी हल्ल्याची धमकी?

10/06/2013 14:26
मुंबई : मुंबईतील रेल्वे स्थानके अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असताना आता रेल्वे गाड्यांत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी अतिरेक्यांनी दिल्याची माहिती हाती आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील नागपूर, पुणे, मुंबईसह प्रमुख रेल्वे स्थानकांसह गर्दीच्या रेल्वे गाड्यांमध्ये बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. प्रवाशांची झाडाझडती सुरू केली आहे.
या धमकीबाबत विचारणा करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्त (मुंबई) प्रभात कुमार यांना फोन करून, एसएमएस करून खात्री करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, अतिरेकी संघटनेद्वारे रेल्वे गाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्याची शक्यता असून, या पार्श्‍वभूमीवर गाड्यांची तपासणी करावी व पोलिसांनी दक्ष असावे, असे पत्र दहशतवादविरोधी पथकाने लोहमार्ग पोलिसांना दिले आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथे परराज्यांमधून येणार्‍या सर्वच गाड्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. राजधानी, दुरांतो, जनशताब्दी, आदी एक्स्प्रेससोबत लोकल गाड्यांमध्ये श्‍वानपथकांद्वारे तपासणी सुरू आहे; बंदोबस्त, गस्त वाढविली आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या रेल्वे विभागांतील सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी तपासणी आणि गस्ती पथकांद्वारे रेल्वे मार्गावरही करडी नजर ठेवली आहे.

- मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे, मुंबई सेंट्रल आदी टर्मिनसवरही विशेष तपास पथके तैनात करण्यात आली आहेत. सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

solapur pune pravasi sangatana