रेल्वेचा 'न्यू जम्बो' मालधक्का तयार

25/04/2011 14:27

सोलापूर - सोलापूर रेल्वेचा "न्यू जम्बो' मालधक्‍क्‍याची उभारणी पूर्ण होत आली असून मालगाडीत मालाची चढउतारही करण्यास सुरवातही झाली आहे. यामुळे आता संपूर्ण 42 वॅगनची मालगाडी फलाटावर उभी असेल. दुसऱ्या बाजुला उभ्या असणाऱ्या ट्रकमध्ये तो माल लगेच चढविता येणेही शक्‍य होणार आहे, किंवा ती पोती फलाटावर रचताही येतील.

याबाबत सोलापूर विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दुर्गेश कटारा यांनी माहिती दिली. या जम्बो मालधक्‍क्‍यामुळे सामानाची चढउतार जलदगतीने करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे, असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच या जम्बो मालधक्‍क्‍याच्या उभारणी कामास प्रारंभ झाला आणि केवळ वर्षभरात हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले. यापूर्वी रेल्वे मालधक्‍क्‍यावर एकदम बोगी लावणे शक्‍य नव्हते. त्यामुळे दहा ते पंधरा बोगींचा संच करून त्या विविध ठिकाणी उभ्या करण्यात येत असत, त्यानंतर त्यातील मालाची चढउतार करण्यात येत असे.
गहू, तांदूळ, खते असा माल पावसात भिजू नये यासाठी संपूर्ण मालधक्‍क्‍यावर सिमेंटचे पत्रे टाकून शेडची उभारणी केली आहे. यापूर्वी अनेकदा पावसात माल संपूर्ण भिजत असल्याने मोठे नुकसान होत होते. या समस्येतून पूर्ण सुटका होणार आहे.

दुसऱ्या बाजुला फलाटाला सरळ ट्रक लावता येणार आहे, यामुळे वॅगनमधून उतरविण्यात येणारा माल सरळ ट्रकमध्ये चढविता येईल. यापूर्वी ही सोय नव्हती. रात्री काम करण्यासाठी सुयोग्य अशी प्रकाश योजना येथे असणार आहे. यातून 24 तास मालधक्का कार्यरत राहू शकेल. अशाच प्रकारचा मालधक्का लवकरच बाळे येथेही उभारण्यात येणार आहे. मात्र हे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.


solapur pune pravasi sangatana