रेल्वे स्थानकावरील अनधिकृत डिजिटल फलक हटले

22/03/2011 12:12

सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारालगतच 40 फूट रुंदीचे उभारलेले डिजिटल फलक रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत कार्यकर्त्यांनी स्वत:हून काढले. फलक न काढल्यास गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाने शनिवारी दिला होता. या प्रकरणी संबंधित कार्यकर्त्यांवर रेल्वे सुरक्षा बलातर्फे गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई सोमवारी होण्याची शक्‍यता आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार कार्यकर्त्यांनी हे डिजिटल फलक काढून घेतले होते. सोलापूर शहर "डिजिटलपूर' बनत चालले असल्याने रेल्वे स्टेशन, बस स्थानके, विविध चौक, रहदारीचे रस्ते येथे डिजिटल फलक उभे करण्याची स्पर्धाच सुरू आहे. अशा पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाने घेतलेली कडक भूमिका स्वागतार्ह मानली पाहिजे.

या संदर्भात रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितले, की रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी आहे, त्यामुळे रेल्वे स्थानकाचा गैरवापर करणे, अनधिकृतरीत्या फलके उभारणे योग्य नव्हे. परवानगी न घेता रेल्वे स्थानक आवारात डिजिटल फलक अथवा अन्य कोणत्याही प्रकारची फलके, पत्रके लावू नयेत. अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासारखी कडक कारवाई होईल.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक उत्तम निर्णय घेतले आहेत. आरक्षण केंद्रातील सोयी, अवैध खाद्यपदार्थांच्या गाड्या हटविणे, प्रवाशांसाठी विविध सोयी देणे, तक्रारींची लगोलग दखल घेणे यामुळे प्रशासनाच्या उत्तम कार्यशैलीचा छाप उमटला आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकाला "आदर्श स्थानक' बनविण्याचा निर्णय घेतल्याने अनेकविध सोयी, सुविधा प्रशासनाकडून प्रदान करण्यात येत आहेत. दीड वर्षांपूर्वीच सोलापूर स्थानकाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. काही महिन्यापूर्वीच आरक्षण केंद्रासमोरील रेल्वेचे छोटे इंजिन प्रवेशद्वाराच्या बगीचात दर्शनी भागात ठेवले गेले आहे. यामुळे स्टेशन आवार विस्तृत बनले असून त्यास देखणे स्वरूपही प्राप्त झाले आहे. मात्र त्यामुळेच अनधिकृत डिजिटल फलकाचा विळखाही लगोलग बसत असल्याने रेल्वे प्रशासनाने अखेर कडक कारवाईचा इशारा देत फलक काढण्याची कारवाई पूर्ण केली. भविष्यातही प्रवाशांच्या सुविधेची पूर्तता होत, गैरवापरासंदर्भात अशीच कठोर भूमिका प्रशासनाने राखल्यास सोलापूर रेल्वे स्टेशन "आदर्श' स्थानकाच्या यादीत अव्वल जागी असेल, हे निश्‍चित.


solapur pune pravasi sangatana