रेल्वे नसलेल्या मार्गावर एसटी वळणार का?

07/03/2011 15:18

कोल्हापूर - कोल्हापूर रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या असून एसटी भाड्यापेक्षा निम्म्या भाड्यात दूरच्या अंतराचा प्रवास करणे प्रवाशांना शक्‍य झाले आहे. यात एसटीने गाडी व फेऱ्या वाढविण्यासाठी अपवाद वगळता कोणतेही ठोस पाऊल उचललेले नसल्याने दिवसागणिक एक ते अडीच लाख रुपयांच्या महसुलावर एसटीला पाणी सोडावे लागत आहे. अशा स्थितीत रेल्वेची सुविधा नसलेल्या मार्गावरील एसटी वाहतूक वाढविली जाणार का, असा प्रश्‍न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे.

जिल्ह्यात साडेसहाशे बसगाड्यांमधून एसटीची प्रवासी वाहतूक होते. दिवसाकाठी साडेचार ते साडेसहा लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वेस्थानकावरून जवळपास पंधराहून अधिक रेल्वे गाड्या आहेत. यात अलीकडच्या काळात कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-हैदराबाद या नव्या गाड्या सुरू झाल्याने एसटी गाड्यांद्वारे मराठवाडा व कर्नाटक सीमाभागात जाणारा प्रवासीवर्ग मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करीत आहे.

रेल्वेच्या एका दिवसाच्या फेरीत किमान ते 30 ते 40 टक्के प्रवासी वाढ झाली आहे. यातील किमान 25 टक्के प्रवासीवर्ग पूर्वी एसटी महामंडळाची सेवा घेणारा होता. येथील कोल्हापूर एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज किमान एक लाख ते अडीच लाख रुपयांचा महसूल देणारा प्रवासीवर्ग रेल्वेकडे गेला आहे. कोल्हापूर-मिरज-सोलापूर या भागातील एसटी गाड्यांसाठी होणारे आरक्षण अवघ्या 2 ते 4 जागांपर्यंत आले आहे. पूर्वी हे प्रमाण 6 ते 14 जागांपर्यंत होते.

ज्या वेळेत रेल्वे असते त्याआधी एक तास सोलापूर, सांगोला, कुर्डूवाडी, कवठेमंहाकाळ, जत, बेळगाव या भागात जाणाऱ्या एसटी गाड्यांमधील प्रवाशांच्या संख्येत प्रत्येकी किमान दहा ते पंधरा प्रवासी एरव्हीच्या तुलनेत कमी होतात. हा मासिक तोटा काढला तर किमान 50 ते 75 लाख रुपयांच्या उत्पन्नावर एसटीला पाणी सोडावे लागते.

येथील मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर बसस्थानकावरून पुणे-कोल्हापूर-पणजी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा विविध मार्गांवर बस सोडल्या जातात. यात कोकणकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या दिवसाला 12 आहे. उर्वरित गाड्या इतर डेपोंकडून येणाऱ्या आहेत. तरीही मध्यवर्ती बसस्थानकातील कोकण फलाटावर 40 ते 50 प्रवासीवर्ग गाड्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. हीच स्थिती पुण्याला जाणाऱ्या बसची आहे. पुण्याला दर अर्धा ते एक तासाला सुटणारी गाडी येथे आहे. मात्र, तेथेही अचानक प्रवासी वाढल्यास गाड्या मिळत नाहीत. त्यामुळे हा प्रवासीवर्गही खासगी प्रवासी वाहतुकीकडे जातो. महामंडळाकडे गाडीची कमतरता असल्याचे सांगितले जाते. नजीकच्या काळात एसटीला नवीन गाड्या केव्हा मिळतील, हे निश्‍चित सांगता येत नाही. तोपर्यंत प्रवाशांना हाल व एसटीला तोटा वाट्याला येण्याची शक्‍यता आहे


solapur pune pravasi sangatana