रेल्वे दुर्घटनेत तीन वर्षांत 261 बळी

09/06/2011 14:54

बेळगाव - रेल्वेखाली सापडून मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होणे अथवा रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या करण्याऱ्यांचा देखील यात समावेश आहे. शहरातदेखील रेल्वे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला असून यासाठी रेल्वे ओव्हर ब्रिजची ठिकठिकाणी गरज भासू लागली आहे. पण, केवळ पाहणी करण्यापलीकडे कोणतीच कारवाई महापालिका असो, अथवा रेल्वे खाते यांच्याकडून झालेली नाही.
रेल्वे अपघातांच्या बेळगाव रेल्वे स्थानकातील नोंदीनुसार 2008 ते 2011 दरम्यान (मे महिन्यापर्यंत) रेल्वे अपघातांमधील बळींची संख्या 261 इतकी आहे. यावर्षी जानेवारी ते मे या केवळ 5 महिन्यांच्या कालावधीत 30 जणांनी आपला जीव रेल्वे अपघातामध्ये गमावला आहे. 2008 पेक्षा 2009 मध्ये अपघातामधील बळींची संख्या काही प्रमाणात खाली उतरली होती. पण, पुन्हा 2010 मध्ये मृतांच्या संख्येत वाढ झाली.

शहरात देखील रेल्वे फाटकावर ट्रॅफिक जॅमचा प्रकार आता वाढला आहे. रेल्वे येण्याची सूचना देत फाटक पडल्यावर देखील त्याखालून जाण्याचा धोकादायक प्रकार घडतो आहे. केवळ दोन ते 3 मिनिटांची प्रतीक्षा करून गेट खुला झाल्यावर तेथून जाण्याची मानसिकताच जणू वाहनधारकांमध्ये राहिलेली नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची घाई दिसत असते. अशा कोणत्या कामासाठी ते इतक्‍या घाईघाईने चाललेले असतात तेच कळत नाही. त्यामुळे रेल्वे जरी समोरून येत असल्याचे दिसत असले तरी गेट ओलांडण्याचे धाडस करताना ते सर्रास दिसतात. यासाठी शहरात काही मोक्‍याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे फाटकावर ओव्हर ब्रिज बांधण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. पण, ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहिली असून ती प्रत्यक्षात अंमलबजवणी झालेली नाही. त्याला राज्यकर्ते आणि रेल्वे प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे.

शहरातील जुने पुणे-बंगळूर रोड, भांदुर गल्ली, कपिलेश्‍वर रेल्वे गेट, तानाजी गल्ली यापैकी एका ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्याची गरज आहे. महापालिकेने याठिकाणची पाहणी करून वेळोवेळी याबाबतचा अहवाल तयार करून शासनाला पाठवून दिला आहे. पण, त्याचा पाठपुरावा करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. तर शासनाने देखील या अहवालांना केराची टोपलीच दाखविली आहे. बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये लोंढा, कॅसरलॉक, शेडबाळपर्यंतचा भाग येतो. गाव अथवा शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या शेजारी काटेरी कुंपण घालण्याची आवश्‍यकता आहे. पण, तशी कोणतीच योजना अद्याप आखण्यात आलेली नाही.

*रेल्वे अपघातामध्ये मृतांची संख्या वर्ष*बळींची संख्या
2008*77
2009*67
2010*87
2011 (मे महिन्यापर्यंत)*30


solapur pune pravasi sangatana