रेल्वे अभियंत्यासह तिघांना लाचप्रकरणी जामीन

10/05/2011 11:53

सोलापूर - चाळीस हजाराची लाच घेणाऱ्या रेल्वे विभागातील अभियंत्यासह तिघांना सोलापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश औटी यांनी आज जामीन मंजूर केला. दर सोमवारी सीबीआय पुणे येथील कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली आहे. रेल्वे अभियंता सातलिंग गंगाधर इंगोले, पत्नी शिल्पा इंगोले आणि रेल्वे शिपाई चव्हाण या तिघांना जामीन मंजूर झाला.

नगर येथील शेतकरी सतीश अविनाश थिटे यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार सीबीआय लाचलुचपत विभागाने कारवाई केली. दरम्यान आरोपींकडून चौकशीदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आल्याची माहिती सीबीआय लाचलुचपत विभागाचे वकील ऍड. आयुब पठाण यांनी आज "सकाळ'ला दिली.

या घटनेची पार्श्‍वभूमी अशी - श्रीगोंदा तालुक्‍यातील लिंपणगाव येथे एका कॅनॉलवरून शेतीसाठीची पाइपलाइन करण्यापूर्वी मध्ये रेल्वे लाइन असल्याने रेल्वे खात्याकडून "नो ऑब्जेक्‍शन' सर्टिफिकेट मिळावे यासाठी या शेतकऱ्याने रीतसर 14 हजार रुपये भरून दोन महिन्यापूर्वी अर्ज केला. मात्र, अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी सुरू केली. खरे पाहता नियमानुसार रक्कम भरल्यानंतर दाखला मिळणे आवश्‍यक होते. रेल्वे खात्यात सर्वाधिक पगार असला तरी भ्रष्ट अधिकाऱ्यांना वरच्या रकमेची भुरळ पडली. श्री. थिटे यांच्यासह आणखी चार जणांनीही अशाच दाखल्यासाठी अर्ज केला असल्याने त्यांनी एकत्रितरीत्या प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र, नगर येथील कनिष्ठ अभियंता विनोद कुमार यांनी वरच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून प्रत्येकी दहा हजार असे एकूण 50 हजारांची मागणी केली. अडवणूक होत असल्याचे पाहून श्री. थिटे यांनी सीबीआय लाचलुचपत विभागात धाव घेतली व आपली कैफियत मांडली. पुणे विभागाने सापळा रचला व सोलापुरातील रेल्वे अभियंता सातलिंग इंगोले, त्यांची पत्नी शिल्पा व शिपाई चव्हाण यांना तसेच नगरचे विनोद कुमार यांना या लाच प्रकरणी ताब्यात घेतले.
 
दरम्यान आज तिघांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दर सोमवारी पुणे कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली. इंगोले आणि चव्हाण यांना पंचवीस हजार रुपये तर श्रीमती इंगोले यांना पंधरा हजारांच्या जात मुचलक्‍यावर जामीन मंजूर झाला. यात सरकारतर्फे ऍड. ए. के. सूर्यवंशी, संशयितांतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. विनोद सूर्यवंशी, ऍड. राहुल खंडाळ यांनी काम पाहिले.


solapur pune pravasi sangatana