मिरज रेल्वे पोलिसांनी हाताळले 29 बेवारस मृतदेह

22/03/2011 12:17

मिरज - येथील रेल्वे पोलिसांनी तीन महिन्यांत 29 बेवारस मृतदेह हाताळले. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरासरी तीन दिवसांला एक मृतदेह सापडत आहे. त्याच्या विल्हेवाटीसाठी रेल्वेकडून निधी मिळत असला तरी त्यांचे वाढते प्रमाण ही पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे.

जंक्‍शन स्थानक असल्याने बेवारस मृतदेह सापडण्याचे प्रमाण मोठे आहे. जानेवारीपासून सापडलेल्या 29 पैकी 17 मृतदेहांच्या नातेवाइकांचा तपास लागला. उर्वरितांवर पोलिसांनीच अंत्यसंस्कार केले. पुणे मार्गावर लोणंद, बेळगाव मार्गावर विजयनगर आणि नव्या पंढरपूर मार्गावर जतरोडपर्यंतची हद्द मिरज रेल्वे पोलिस सांभाळतात. या मार्गांवरून मिरजेकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये मृतदेह फेकण्याचे प्रमाण मोठे आहे. विशेषतः कर्नाटकातून येणाऱ्या गाड्यांमध्ये सातत्याने मृतदेह टाकण्यात येतात. मिरज स्थानकात मात्र त्यांची जबाबदारी स्वीकारून पुढची प्रक्रिया पार पाडली जाते.

सर्रास मृत्यू हे भिकाऱ्यांचेच होतात. हे मृतदेह फलाटावर पडून राहतात. क्षयरोगाने मरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. त्याशिवाय रेल्वेच्या धडकेत मृत्यू, आत्महत्या यांचेही प्रमाण मोठे आहे. मिरज शहरात धार्मिक, वैद्यकीय कारणासाठी या व्यक्ती येतात आणि येथेच राहतात. अनेकवेळा त्यांचे नातेवाईकच मिरजेत सोडून जात असल्याचा अनुभव आहे, असे पोलिस निरीक्षक श्री. सतीश माने यांनी सांगितले. दररोजच्या अन्नाची तजवीज होत असल्याने भिकाऱ्यांसाठी मिरज हे अनुकूल क्षेत्र ठरले आहे. त्याचा ताण येथील प्रशासनावर पडत आहे. मृतदेहांच्या दफनविधीसाठी रेल्वे पाचशे रुपये निधी देते. कोल्हापुरात "परमधाम' ही संस्था बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीचे काम करते. जयसिंगपूर, मिरज येथे मात्र पोलिसांनाच हे पुण्यकर्म पार पाडावे लागते. काही मृतदेहांच्या ओळखी पटतात, तर काहींवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या वारसांचा शोध लागतो. निपाणीमधील एका पुरुषाचा मिरजेत मृत्यू झाला, मात्र त्याच्या नातेवाईक महिलेने तो ताब्यात घ्यायला नकार दिला; त्यामुळे बेवारस म्हणूनच त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले.

सध्या पंढरपूर मार्गावर नव्याने वाहतूक सुरू झाल्याने मिरज आणि पंढरपुरातील भिकाऱ्यांच्या आयात-निर्यातीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. साहजिकच बेवारस मृतदेह आणि त्यांची विल्हेवाट ही वाढीव डोकेदुखी होणार आहे.


solapur pune pravasi sangatana