दुहेरीकरणास हिरवा कंदील ; दौंड ते वाडी दरम्यान विद्युतिकरणही होणार

23/05/2012 10:47
सोलापूर - रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरवात येत्या 15 जूनपासून होणार आहे. 1514 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. दौंड ते वाडी या रेल्वे रुळाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यात येईल.

कर्नाटक, महाराष्ट्र  आणि आंध्रप्रदेश यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला सोलापूर रेल्वे विभाग मध्य रेल्वेत सर्वाधिक उत्पन्न देण्याच्या बाबतीत तिस -या स्थानी आहे. दौंड ते वाडी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने आशियाई विकास बँकेकडून 1600 कोटींचे कर्ज घेतले आहे. हे क र्ज यापूर्वीच मंजूर झाले होते. निविदा न निघाल्यामुळे याचे काम रखडले होते. काही दिवसांपूर्वीच निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली. दुहेरीकरणास हिरवा कंदील मिळाला.

दौंड-वाडी हे अंतर 350 किलोमीटर आहे. यातील दौंड ते भिगवण, मोहोळ ते होटगी व गुलबर्गा ते वाडी या स्थानकादरम्यानच्या म्हणजेच 350 पैकी 125 किलोमीटरचे काम आधीच पूर्ण झाले आहे. भिगवण ते मोहोळ 127 कि. मी.चा मार्ग व होटगी ते गुलबर्गा 98 कि.मी. रेल्वे दुहेरीकरणाचे काम होणे बाकी आहे.

42 महिन्यांत होईल दुहेरीकरणाचे काम पूर्ण - दुहेरीकरणाच्या निविदा 4 मे रोजी मंजूर झाल्या. आय. एल. एफ. एस. व कालंदी नावाच्या ठेकेदारास भिगवण ते मोहोळ दरम्यान होणा -या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. होटगी ते गुलबर्गा दरम्यानचे काम एपीआर व व्हीएनआर या कंपनीला देण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 42 महिन्यांची  मुदत देण्यात आली आहे.

14 रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार - सावळगी, गौडगाव, फुलाली, बोरोटी, नागणसूर, तिलाठी, अनगर, वाकाव, वडशिंगे, धवस, पोफळस, वाशिंबे, जेऊर, हुंचीहडगील या रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई होणार जवळ - सोलापूरहून पुणे व मुंबईला जाताना एकच लोहमार्ग असल्यामुळे अनेक गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागते. त्यामुळे अनेक गाड्यांना उशिर होतो. दोन लोहमार्गामुळे गाड्यांना थांवावे लागणार नाही. त्यामुळे प्रवासातील 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचेल.

स्पीड @ 140 - नव्याने होणारा मार्ग हा फिटनेस ट्रॅक असणार आहे. या मार्गावरून धावणा -या गाड्या ताशी 140 कि.मी. वेगाने धावतील. सध्या सोलापूर विभागातून धावणा -या गाड्या ताशी 105 ते 110 च्या वेगाने धावतात.

यामुळे दळणवळण अधिक गतिमान होइल. तसेच तिची सुरक्षितता ही अधिक बळकट होइल. या मार्गामुळे सोलापूर विभागावरील गाड्यांच्या संख्येतही वाढ होईल.’’

सुशील गायकवाड, वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक

  दौंड-वाडी 350 किलोमीटर रुळाचे दुहेरीकरण

 छोटे 537 तर मोठे 29 पूल उभारण्यात येतील

 55 रेल्वे क्रॉसिंग गेट नव्याने बांधण्यात येणार

 42 महिन्यांत दुहेरीकरण होणार पूर्ण

 आशियाई विकास बँकेकडून 1600 कोटींचे कर्ज

solapur pune pravasi sangatana