ज्येष्ठांच्या शिष्टाईने संजय शिंदेंची सरशी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बदलत्या राजकारणाचे फलित

05/11/2011 10:38

सोलापूर। दि. 4 (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी संजय शिंदे गेल्या वर्षीही इच्छुक होते. ज्येष्ठ संचालकांनी त्यांच्यासाठी शिष्टाई केली होती. पण ऐनवेळी मोहिते-पाटील यांनी दिलीप सोपलांचा पत्ता टाकल्यामुळे शिष्टाई अपयशी ठरली. आता अध्यक्षपदासाठी शिंदे यांच्याबरोबर राजन पाटील यांचे नाव चर्चेत होते. त्यांनी नकार दिल्यामुळे संजय शिंदेंच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाले.
जिल्हा बँकेच्या उपविधीनुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक दरवर्षी घ्यावी लागते. गेल्या वर्षी बँकेची निवडणूक झाल्यानंतर संजय शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बँकेच्या ज्येष्ठ संचालकांमार्फत अध्यक्षपदासाठी 'फिल्डिंग' लावली होती. तत्कालीन नेत्यांच्या राजकारणात शिंदे यांचे नाव मागे पडले. गेल्या महिन्यात झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत बँक अधिका:यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांनी बँकेच्या उपविधीनुसार अध्यक्षांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून निवडणूक घेण्याची मागणी केली.
सुरेश हसापुरे यांच्या पत्राचे निमित्त साधून संजय शिंदेंनी पुन्हा तयारी सुरू केली. आ. बबनराव शिंदे, सुधाकर परिचारक यांनी त्यांना मदत केली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हवाल्याने पुन्हा राजकारण झाले. आज सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृहावर आ. गणपतराव देशमुख, आ. दिलीप सोपल, संजय शिंदे यांची बैठक झाली. त्यानंतर ही सर्व मंडळी बँकेकडे रवाना झाली. बँकेत 11 वा. सर्व संचालकांची बैठक झाली. प्रतापसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, रश्मी बागल हे तीन संचालक अनुपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला सुधाकर परिचारक यांनी काय करायचे आहे ते सांगा. कोण इच्छुक आहे, असे विचारले. काही वेळ कोणीच बोलले नाही. त्यानंतर संजय शिंदे उठले आणि मी इच्छुक आहे. गेल्या वर्षी मी इच्छुक होतो, मला संधी मिळाली नाही, मला आता संधी द्यावी, असे म्हणाले. आता उपाध्यक्षपदासाठी कोण इच्छुक आहे, असे विचारण्यात आले. बबन आवताडे यांनी मी इच्छुक आहे, असे सांगितले. दोघांचे मत घेतल्यानंतर सुधाकर परिचारक यांनी आता सर्व ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, असे सांगितले. यादरम्यान आ. दिलीप माने यांनी ज्येष्ठ नेत्यांव्यतिरिक्त नव्या माणसाचे नाव सुचविण्यात यावे, नाही तर आम्ही निर्णय घेऊ, अशी सूचना केली.
यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील, आ. गणपतराव देशमुख, सुधाकर परिचारक, भाई एस. एम. पाटील, दिलीप सोपल आदींची बैठक झाली. बबन आवताडे यांच्या नावाला या बैठकीत हरकत घेण्यात आली. बैठकीनंतर निवडणूक प्रक्रिया झाली. अध्यक्षपदासाठी शिंदे यांचे तर उपाध्यक्षपदासाठी गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांचे नाव संचालकांसमोर जाहीर करण्यात आले. बँकेसमोर सकाळपासून शिंदे समर्थकांची गर्दी होती. संचालकांची बैठक जाहीर झाल्यानंतर गुलाल उधळून आतषबाजी करण्यात आली.
बँक संगणकीकृत करणार : शिंदे
निवडीनंतर संजय शिंदे म्हणाले की, जिल्हा बँक संगणकीकृत करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. बँकेचे कर्मचारी जुने आहेत. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. शेती आणि औद्योगिक क्षेत्राला कजर्वाटप करण्यास प्राधान्य देणार आहोत. बँकेत गेल्या 45 वर्षापासून काम करणारे संचालक आहेत. माङो वय 42 आहे. त्यामुळे मला ज्येष्ठांनी काम करण्याची संधी दिली आहे. बँकेत गटबाजी दिसणार नाही.
आता माझा नंबर : राजन पाटील
पत्रकारांसमोर आल्यानंतर राजन पाटील यांनी माझी अध्यक्ष होण्याची इच्छा नाही, असे सांगितले, मात्र संजय शिंदे यांची निवड जाहीर झाल्यानंतर त्यांनी काही संचालकांसमोर आपले मन मोकळे केले. माङो आणि संजय शिंदेचे नाव एकाच वेळी येत असल्याने मला पुढे होता येत नव्हते. त्याला संधी मिळाली आहे, आता माझा नंबर आहे.
कापसेंचे कोणी ऐकेना
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. यावेळी ज्येष्ठ नेत्यांनी आता यादी वाचू नका, लवकरात लवकर नावे जाहीर करा, अशी मागणी केली. त्यामुळे डॉ. देशमुख यांनी नावे जाहीर केली. यादरम्यान पाठीमागे बसलेले संचालक अरुण कापसे हे सूचक, अनुमोदकपण सांगा म्हणून ओरडत होते. त्यांचे म्हणणे कोणीही ऐकले नाही. शेजारी बसलेले राजन पाटील, जयवंतराव जगताप यांनीही सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनीही दुर्लक्ष केले.
अजित पवारांकडून अभिनंदन
अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आ. दीपक साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून संजय शिंदे यांच्याकडे दिला. अजित पवार यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले.


solapur pune pravasi sangatana