गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये लॅपटॉपची चोरी, संशयितास चोप

09/08/2011 16:12

मनमाड, २ ऑगस्ट
गुवाहाटी-मुंबई एक्स्प्रेस गाडीच्या वातानुकुलीत बोगीतून प्रवास करणाऱ्या बिहारमधील एका प्रवाशाचा लॅपटॉप चोरी प्रकरणात संशयितास धावत्या रेल्वेत प्रवाशांनी चोप देऊन मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. पण, तत्पुर्वी त्याचा दुसरा साथीदार हा बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकात उतरून लॅपटॉप घेवून पळून गेला. तसेच हे दोघे गाडीत संशयास्पद हालचाली करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या प्रकरणी संशयित जगदीप सिंग याच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. चंदनकुमार सिंग (रा. देबूसराय, बिहार) यांनी या बाबत मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जगदीप सिंग व सरफदीप सिंग हे दोघे इटारसी येथून मुंबईला जाण्यासाठी गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये बसले. त्यांच्याकडे सर्वसाधारण तिकीट असताना सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून ते वातानुकूलीत बोगीत पोहोचले. मात्र, प्रारंभापासून दोघांच्याही हालचाली प्रवाशांना संशयास्पद वाटल्या. गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळातच सरफदीपसिंगने तक्रारदाराचा लॅपटॉप चोरला आणि बऱ्हाणपूर रेल्वे स्थानकानजीक गाडीचा वेग कमी झाला असताना उडी मारून फरार झाला. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी जगदीपसिंगला घेरून गाडीतच चोप दिला. तिकीट तपासनिकाने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ही गाडी मनमाडला येण्यापूर्वी पोलिसांनी सापळा लावला आणि एसी कोचमधून जगदीपसिंगला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन-तीन प्रकारचे मोबाईल फोनचे सीमकार्ड आढळले. या संशयिताची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. या घडामोडीत गाडी मनमाड रेल्वे स्थानकात तब्बल चाळीस मिनिटे खोळंबून होती. बोगीतील तिकीट तपासनीकाचा जबाब नोंदवल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. लॅपटॉप चोरीच्या प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


solapur pune pravasi sangatana