कोल्हापूर-हैदराबाद गाडी ठरतेय "टाईमपास एक्‍स्प्रेस'

03/06/2011 12:11

मिरज - कोल्हापूर-हैदराबाद ही गाडी "टाईमपास एक्‍स्प्रेस' ठरत आहे. वेळा पाळण्यात ती अयशस्वी ठरली असून सातत्याने सरासरी दोन ते चार तास विलंबाने धावत आहे. हुबळी विभागात या गाडीला सवतीची वागणूक देण्यात येत असल्याने कोल्हापूर-हैदराबाद प्रवास कंटाळवाणा ठरत आहे.

ममता बॅनर्जींच्या रेल्वे अर्थसंकतील तरतुदींनुसार 17 फेब्रुवारीपासून ही गाडी सुरू करण्यात आली. त्यासाठी हरिप्रिया एक्‍स्प्रेसचे एका तपापासूनचे हैदराबाद कनेक्‍शन बंद करण्यात आले. हरिप्रियाचे हैदराबादसाठीचे सहा डबे काढून टाकले. गुंटकल जंक्‍शनवर हैदराबादसाठीचे डबे जोडणे आणि सुटे करणे यासाठीचा दोन तासांचा वेळ वाचवण्यात आला. प्रवाशांचा सक्तीचा थांबा रद्द झाला, पण तीन तास विलंबाने गाडी धावत असल्याने हैदराबादच्या प्रवाशांना फारसा फायदा झाला नाही.

कोल्हापूर-हैदराबाद एक्‍स्प्रेस (17416 आणि 17415) गुरुवार, शुक्रवार, सोमवार आणि मंगळवार असे चार दिवस सकाळी साडेसात वाजता कोल्हापुरातून सुटते. हैद्राबादमध्ये ती पहाटे साडेचार वाजता पोहोचणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ती दोन ते तीन तास उशिरा पोहोचते. हैदराबादमधून मंगळवार, बुधवार, शनिवार आणि रविवारी रात्री साडेअकरा वाजता निघते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता ती कोल्हापुरात येण्याची नियोजित वेळ आहे. प्रत्यक्षात ती रात्री दहा, अकरापर्यंत केव्हाही येते. एकवीस तासांचा हा प्रवास कधी-कधी चोवीस तर कधी सव्वीस तासांपर्यंत लांबतो आहे.

मिरजेत विजयनगर स्थानकानंतर हुबळी विभाग सुरू होतो. या विभागात हैदराबाद गाडीला प्राधान्य देण्यात येत नसल्याने तिला विलंब होत जातो. सर्रास स्थानकांवर या गाडीला क्रॉसिंगसाठी थांबवले जाते. एखादी पॅसेंजर किंवा मालगाडी येणार असली तरीही हैदराबाद एक्‍स्प्रेसला थांबवून ठेवले जाते. घटप्रभा स्थानक म्हणजे या गाडीसाठी हक्काचा थांबा ठरले आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास ही गाडी या स्थानकावर येते. त्यावेळी मागून येणाऱ्या यशवंतपूर-दादर (चालुक्‍य), बंगळूर- कुर्ला या गाड्यांसाठी हैदराबाद एक्‍स्प्रेस या स्थानकावर थांबवून ठेवली जाते; किंबहुना मालगाडी येणार असेल तरीही तिचा थांबा ठरलेला असतो. नवी गाडी असल्याने तिला प्राधान्य देण्यात येत नसल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण आहे; तथापि या गाडीचे नवेपण संपले तरी तिचा सवतीमत्सर मात्र संपलेला नाही.

हरिप्रियाचे हैदराबाद कनेक्‍शन रद्द केल्याने वेळेत बचत होईल, ही प्रवाशांची अपेक्षा फोल ठरली आहे. प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या या गाडीला एक्‍स्प्रेस का म्हणायचे हा प्रश्‍न आहे. तीन महिन्यांपुर्वी सुरू झालेली ही एक्‍स्प्रेस नव्या पंढरपूर ब्रॉडगेजवरून सोडण्याची मागणी आहे. जून महिन्याच्या अखेरीस तसा निर्णय अपेक्षित असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. सध्या ही गाडी बेळगाव-गुंटकल-विकाराबादमार्गे 998 किलोमीटरसाठी एकवीस तासांचा वेळ घेते. त्यासाठी जनरलला 176 रुपये, स्लिपरला 299 रुपये आणि एसी थ्री टायरला 839 रुपये तिकीट आहे. प्रस्तावित मिरज-पंढरपूर-सोलापूर-गुलबर्गा-शहाबादवाडीमार्गे ही गाडी धावल्यास 603 किलोमीटर अंतर होणार आहे. सुमारे चारशे किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे. या प्रवासाला फक्त सुमारे बारा तासांचा वेळ अपेक्षित आहे. त्यासाठी जनरलला 131 रुपये आणि एसी थ्री टायरला 622 रुपये तिकीट असणार आहे. नव्या मार्गासाठी पाठपुरावा गरजेचा आहे.


solapur pune pravasi sangatana