वारीच्या स्वागताला सज्ज

20/06/2011 12:00

 

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर, आळंदीकर सज्ज झाले आहेत. प्रशासनाने सुविधांविषयक कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत.

पुढील आठवड्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहू, आळंदीत येण्यास सुरुवात होणार आहे. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था दोन्ही ठिकाणच्या शाळा, धर्मशाळांमध्ये करण्यात आली आहे. आळंदीत साडेतीनशेहून अधिक लहानमोठ्या धर्मशाळा आहेत. तर, देहूत पंधरा धर्मशाळा उपलब्ध आहेत. दोन्ही संस्थानांच्यावतीने पालखीरथाची कामे हाती घेण्यात आली आहेत. ती येत्या दोन दिवसांत पूर्ण होतील, असे सांगण्यात आले. पालख्यांचे प्रस्थान देहू आणि आळंदीतून अनुक्रमे २२ आणि २३ जूनला होणार आहे. त्या ठिकाणी देहू ग्रामपंचायत आणि आळंदी नगरपरिषद यांच्यावतीने पाणी, आरोग्य याविषयीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत.

बैलजोडीची आळंदीत मिरवणूक

आळंदी ते पंढरपूर मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाला सुरेश नारायण भोसले-पाटील यांची बैलजोडी जुंपण्यात येणार आहे. जिवा-शिवा अशी त्यांची नावे आहेत. रथाला बैलजोडीचा मान घुंडरे, कुऱ्हाडे, रानवडे, वरखडे, वहिले आणि भोसले या क्रमानुसार दिला जातो. या बैलजोडीची शुक्रवारी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. माऊली मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे, यात्रा समितीचे सभापती डी. डी. भोसले-पाटील, नगरसेवक रामदास भोसले यावेळी उपस्थित होते.

पालखी मार्गांवर तपासणी

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अन्न परवाना विभागाच्यावतीने २३ ते २५ जूनच्या कालावधीत तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, मॅगझिन चौक, दिघी, चिंचवड स्टेशन, पुणे-मुंबई महामार्ग परिसर या ठिकाणी पालिकेच्या पथकाने तपासणी केली. हॉटेल, वडापाव हातगाड्या, चहाच्या टपऱ्या, भेळ, स्नॅक्स सेंटर, बेकरी चालकांना दक्षतेबाबत सूचना दिल्या. या पथकामध्ये रवींद जेकटे, रवींद नागवेकर, लक्ष्मीकांत साबळे, अविनाश भांडवलकर, दत्तात्रेय भालेकर यांचा समावेश होता.

महापालिकेतर्फे सूचना

- अन्नपदार्थ ताजे आणि सकस असावेत.

- दुग्धजन्य पदार्थांचे मोफत वाटप नको.

- पालखी मार्गांवर तपासणी मोहीम राबविणार.

- पिण्याचे पाणी पालिकेच्या नळाचेच वापरावे.

- वारकऱ्यांना वाटपाच्या अन्नाची नासाडी टाळावी


solapur pune pravasi sangatana