रेल्वे हमाल व वाहतूकदार वाद मिटला

03/06/2011 12:16

नगर - येथील रेल्वे स्थानकातील मालधक्‍क्‍यावरील हमाल व वाहतूकदार यांच्यातील वाद मिटला असून, त्यांच्यात तीन वर्षांसाठी करार झाला आहे. त्यामुळे खत व सिमेंटचा पुरवठा सुरळीत झाला आहे.

वाहतूकदार कंपनी हुंडेकरी असोसिएशन व माथाडी कामगार यांच्यात एक एप्रिलपासून आर्थिक कारणावरून वाद सुरू होता. त्यामुळे नगर व कोपरगाव रेल्वे मालधक्‍क्‍यांवर होणारा खत व सिमेंटचा पुरवठा विस्कळित झाला होता. कृषी आयुक्तालयाच्या नियोजनाप्रमाणे खरीप हंगामासाठी मे महिनाअखेर 55 हजार 690 मेट्रिक टन खत पुरवठा होणे अपेक्षित होते; परंतु हमाल व वाहतुकदारांच्या वादामुळे फक्त 23 हजार 500 मेट्रिक टन खत जिल्ह्यात उपलब्ध झाले होते. त्यामुळे खताची टंचाई निर्माण होणार होती. आता हमाल व वाहतूकदार यांच्यात तीन वर्षांचा करार होऊन वाद मिटला आहे, त्यामुळे खत पुरवठा सुरळीत सुरू झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संभाजी गायकवाड यांनी सांगितले.

हमाल व वाहतूकदार यांच्यात झालेल्या करारानुसार 33 रुपये दराने वरई दिली जाणार आहे व प्रति बॉक्‍सच्या चढ-उतारासाठी दोन हजार सहाशे रुपये देण्याचे ठरले आहे. त्यामुळे मालधक्‍क्‍यांवर हमालांनी काम सुरू केले आहे, असे हमालांचे टोळीप्रमुख विलास उबाळे यांनी सांगितले. या वादामुळे सिमेंटची टंचाई निर्माण झाली होती. सिमेंटचे भावही वाढल्याने त्यांचा बांधकामावरही परिणाम झाला होता.

या आठवड्यात जिल्ह्यात झुआरी व आरसीएफ या कंपन्यांची पाच हजार मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. पुढील आठवड्यात विविध कंपन्यांची 15 हजार मेट्रिक टन खते जिल्ह्यात उपलब्ध होतील. ज्या कंपन्यांनी एप्रिल व मे महिन्यांत नियोजनापेक्षा कमी खत पुरवठा केला आहे, अशा कंपन्यांनी जूनमध्ये वाढीव खत पुरवठा करावा, अशी सूचना संभाजी गायकवाड यांनी केली आहे.

15 भरारी पथके
शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे व सहजासहजी खते उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्ह्यात 15 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील खत सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. ही समिती दर सोमवारी खत पुरवठ्याचा आढावा घेणार आहे. खत पुरवठ्याबाबत तक्रारी असल्यास शेतकऱ्यांना समितीकडे तक्रारी करता येणार आहेत.


solapur pune pravasi sangatana