राहुलकुमारची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच

03/06/2011 12:29

सांगली - रेल्वे प्रवासात गंभीर जखमी झालेल्या राहुलकुमारची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. त्याच्या नातेवाइकांचा अद्याप ठावठिकाणा लागला नसला, तरी "सिव्हिल'च्या प्रशासनाने त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू ठेवली आहे. त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठीही त्यांनी मध्य प्रदेशला संपर्क साधला आहे.

राहुलकुमार 4 मे रोजी भिलवडी-जुळेवाडीच्या दरम्यान चालत्या रेल्वेतून पडला. त्याच्या डोक्‍याला मार लागल्याने तो बेशुद्धावस्थेत पडून होता. तासगाव पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याचे नाव, गाव समजले नाही तरीही तातडीने उपचार सुरू केले. तज्ज्ञ डॉक्‍टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या मेंदूच्या नसांना मार बसल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक नियुक्त केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे तो तीन दिवसांनी शुद्धीवर आला. त्याने नाव सांगितले; पण गावाचे नाव केवळ मध्य प्रदेश सांगितले आहे. त्यामुळे त्याचे पूर्णनाव, गावाचे नाव समजले नाही. तरीही त्याच्यावर उपचारात ढिलाई केली नाही. डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचारी त्याची काळजी घेत आहेत.
त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याची येथे सोय नाही. त्यामुळे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात त्याला हलवण्याचा निर्णय झाला. या रुग्णालयानेही तयारी दर्शवली; पण त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत त्यामुळे शस्त्रक्रियेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे जे. जे. रुग्णालयात त्याला हलवण्याचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे आता येथेच तज्ज्ञ डॉक्‍टरांमार्फत उपचार सुरू ठेवले आहेत. त्याच्या प्रकृतीचा काहीअंशी धोका टळला असला तरी तो पूर्णपणे शुद्धीवर नाही. त्यामुळे तो पूर्ण बरा व्हावा म्हणून रुग्णालय प्रशासनाची धडपड सुरू आहे. पोलिसांमार्फत मध्य प्रदेशमध्ये त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. "सिव्हिल'मध्ये चांगले उपचार, दखल घेतली जात नाही हा लोकांचा गैरसमज डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी दूर केला आहे.


solapur pune pravasi sangatana