मिरज-पंढरपूर आता अवघ्या दीड तासांत !

04/11/2011 14:43
मिरज-पंढरपूर रेल्वेची गती शंभर किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. सध्या या मार्गावर गाड्या साठच्या गतीने धावतात. वाढीव गतीसाठी गेल्या दोन दिवसांत केलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवण्याची प्रतीक्षा आहे.

फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहतुकीला परवानगी देताना सुरक्षा आयुक्तांनी साठ किलोमीटर प्रतितास गतीचे निर्बंध घातले होते. सध्या सर्व प्रवासी आणि मालगाड्या याच गतीने धावतात. कोल्हापूर-सोलापूर आणि कोल्हापूर- नागपूर या एक्‍स्प्रेस गाड्यांची गतीदेखील साठच आहे. मिरज ते पंढरपूर मार्ग नवा असल्याने ही गती कायम राखली जाते. पंढरपूरनंतर मात्र गाड्या 90 किलोमीटर प्रतितास वेगाने धावतात. मिरज-पंढरपूर मार्गावरील वाहतुकीला नऊ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. यादरम्यान एकही अपघात घडलेला नाही. गेल्या आषाढी एकादशीला दिवसभरात डझनभराहून अधिक गाड्या प्रवाशांनी भरभरून धावल्या. गेल्या तीन महिन्यांत या मार्गावर जोरदार पाऊसदेखील झाला. या सर्वांना आपण सक्षम असल्याचे रेल्वेमार्गाने दाखवून दिले आहे.
रेल्वेस्थानकांत गाडी येताना आणि जाताना प्रतितास पंधरा किलोमीटर गती असते. सोलापूर विभागाने मिरज- पंढरपूरदरम्यानच्या सर्व स्थानकांवर ही गती चाचणीसाठी तीस किलोमीटर केली. ही चाचणीदेखील यशस्वी ठरली. या पार्श्‍वभूमीवर गाड्यांची गती वाढवण्याची शिफारस सोलापूर विभागाने केली होती. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात दिल्लीस्थित सहसुरक्षाआयुक्तांनी येऊन चाचणी घेतली होती. चाचणीचे इंजिन शंभर किलोमीटर प्रतितास या गतीने पळवले. ही चाचणी यशस्वी झाली. त्यांच्या अहवालानंतर मुख्य सुरक्षा आयुक्तांनी काल व आज पाहणी केली. दहा ट्राल्यांमधून काल अधिकाऱ्यांनी मार्गाच्या मजबुतीची पाहणी केली. आज सात डब्यांची गाडी दुपारी तीन वाजता एकशेवीसच्या गतीने मिरज स्थानकातून सोडण्यात आली; ती अवघ्या दीड तासांत पंढरपुरात पोहोचली. त्यामुळे ही चाचणी यशस्वी झाली. चाचणीचा अहवाल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिला जाईल, त्यांच्या मंजुरीनंतर गती वाढवली जाईल. त्यामुळे येत्या डिसेंबरपूर्वी देवाची गाडी शंभरच्या गतीने धावण्याची अपेक्षा आहे.

अभियांत्रिकी विभागाने वाढीव गतीची तयारीदेखील सुरू केली आहे. रुळांशेजारील खडी पॅकिंगचे मशीन येथे दाखल झाले असून दोन दिवसांत त्याचे काम सुरू होईल. गतीबाबतचे सूचनाफलक बदलण्याचेही काम सुरू झाले आहे.

कोल्हापूर-सोलापूर फक्त चार तासांत
सध्या मिरज ते पंढरपूर या 137 किलोमीटर अंतरासाठी पंढरपूर पॅसेंजर तीन तास वेळ घेते. या गाड्या शंभरच्या गतीने धावल्यास अवघ्या दीड तासांत पंढरपूरला जाता येईल. पंढरपूर ते सोलापूर व्हाया कुर्डूवाडी या मार्गावर सध्या नव्वद किलोमीटर प्रतितास या गतीने गाड्या धावतात. ही गतीदेखील 105 किलोमीटरपर्यंत वाढवावी, अशी शिफारस सोलापूर विभागाने केली आहे. कोल्हापूर सोलापूर या प्रवासाला सध्या पाच तास लागतात. नव्या गतीनुसार या वेळेत दोन तासांची बचत होऊ शकते

solapur pune pravasi sangatana