कुर्डुवाडी रेल्वे कारखानासह दुहेरीकरणालाही विशेष गती हवी

09/11/2011 13:28
सोलापूर - रेल्वे अर्थसंकल्पात विभागाच्या वाट्याला दरवर्षी येणारी निराशा व तुटपुंजा वाटा पाहता वर्षानुवर्षे मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याची सोलापूरकरांची भावना दाट आहे. राजकीय पाठपुरावा नसणे ही खंत सोलापूर विद्यापीठासह सोलापूर रेल्वे विभागाच्याही मनात खदखदत आहेच. त्या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या पोतडीतून सोलापूरकरांच्या वाट्याला काय येणार ? हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विभागातून पाच गाड्यांचा प्रस्ताव अर्थसंकल्पासाठी पाठविण्यात आला आहे. त्यात सोलापूर हावडा (कुर्डुवाडी - लातूर - परभणी मार्गे), सोलापूर अजमेर (दौंड कोपरगाव मनमाडमार्गे),सोलापूर नागपूर (कुर्डुवाडी लातूर परभणी मार्गे), कोल्हापूर हैदराबाद (पंढरपूर कुर्डुवाडी मिरजमार्गे) व लातूर मिरज या गाड्यांचा समावेश आहे. मात्र, सोलापूर-मुंबईसाठी आणखी एक गाडी सायंकाळच्या सुमारास हवी आहे, त्याशिवाय विजापूर-मुंबई-विजापूर ही आठवड्यातून चार दिवस असणारी पॅसेंजर दैनंदिन करावी, ही मागणी आहेच.

कुर्डुवाडी रेल्वे कारखान्यात ब्रॉडगेज डबे तयार व्हावेत, हा कारखाना सुरू राहावा, ही मागणी सातत्याने डावलण्यात येत आहे. यासाठी अर्थसंकल्पातून भरीव तरतूद होण्याची गरज आहे. दौंड ते वाडी दरम्यान 270 किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण बाकी आहे, यासाठी आशिया बॅंकेतून निधी उपलब्ध झाला आहे, मात्र वाढीव निधी देत हा प्रकल्प तातडीने मार्गी लावला जाणे अपेक्षित आहे. कारण या कामानंतरच आठशे कोटी रुपये खर्चाचे विद्युतीकरण प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.

पुणे ते सिकंदराबाद ही जनशताब्दी गाडी सध्या प्रायोगिक तत्त्वावर विशेष गाडी म्हणून सेवा देत असली तरी उपयुक्तता पाहता ही गाडी कायमस्वरूपी सेवेत यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. याशिवाय सोलापूर स्थानकातील एक क्रमांकाचा प्लॅटफॉर्म 18 डब्याचाच आहे. तो वाढवून 24 डब्यांचा व्हावा, याबरोबरच 24 डब्यांसाठी स्वतंत्र पीटलाईन उभी करण्यात यावी, जेणेकरून सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसला वाढीव सहा डबे जोडता येतील.

पंढरपूर-मुंबई दैनंदिन व्हावी
पंढरपूर-मुंबई तीन दिवस आहे, ती दैनंदिन करावी, ही प्रमुख मागणी आहे. पंढरपूर-मिरज हा ट्रॅक सुरू झाला मात्र या मार्गावरील पंढरपूर कुर्डुवाडी नियमित धावणाऱ्या सोयीच्या काही गाड्या बंद करण्यात प्रशासनाने काय डाव साधला हे समजत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या गाड्या पूर्वीसारख्याच सोडण्यात याव्यात, ही मागणी आता नव्याने होत आहे. पंढरपूर लोणंद मार्ग हा तर रेल्वेने केलेला सर्वात मोठा विनोदच आहे की असे वाटू लागण्यासारखी परिस्थिती दिसून येत आहे, मार्गाचे केवळ सर्वेक्षण झाले आहे, या बाबतीतही राजकीय पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत पंढरपूरवासीयांतूनही होत आहे.

बार्शीकरांच्या मागण्या प्रलंबितच
ब्रॉडगेज मार्गावरील बार्शी मालवाहतुकीतील महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे मालधक्का तातडीने उभे करण्याची मागणी आहे. याचबरोबर स्टेशन लांब पडत असल्याने आरक्षण सेंटर शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू व्हावी, अशी मागणी आहे. वैराग परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बार्शी सोलापूर रोडवरील राजन मिलजवळ नव्याने रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी आहे. स्टेशन लांबवर असल्याने सिटी बस सोडण्यात यावी, शेअर रिक्षा अशा काही मागण्या स्थानिक स्तरावर मांडण्यात येतात.

रेल्वे अर्थसंकल्पात नव्या गाड्या सुरू व्हाव्यात, अशी मागणी सातत्याने होतेच. ते राहिले बाजूला उलट पंढरपूर कुर्डुवाडी या मार्गावरील सोयीच्या सर्व गाड्या बंद करून रेल्वे प्रशासनाने असुविधाच केली आहे. त्या गाड्या पूर्ववत सुरू व्हाव्यात.

solapur pune pravasi sangatana