विज्ञान आणि तंत्रज्ञान

स्वतंत्र भारताचा जन्म अणु युगाच्या सुरुवातीच्या काळात झाला. त्याच्या सुदैवाने जवाहरलाल नेहरू यांच्या सारखे द्रष्टे पुढारी मार्गदर्शन करण्यास सज्ज होते. त्यांच्या बरोबरीने भारतातील वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती योग्य मार्गाने व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे प्रज्ञावंत डॉ. होमी भाभा होते. पंडित नेहरूंच्या प्रेरणने राष्ट्रीय प्रयोगशाळांची एक मालिकाच प्रस्थापित केली गेली; तर भाभांच्या प्रेरणेने टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि अणु संशोधन केंद्र कार्यान्वित झाली. त्याचप्रमाणे १९५८ मध्ये लोकसभेत विज्ञान धोरण विषयक ठराव मंजूर होऊन देशातील संशोधन कार्याला एक प्रकारची चालना मिळाली. या चालनेचे दृश्य स्वरूप म्हणजे महाराष्ट्रात एक विज्ञान व तंत्रज्ञान कक्ष सुरू करण्यात आला. प्रत्येक घटक राज्यात अशा प्रकारचे कक्ष सुरू करण्यात येऊन साऱ्या देशाचीच वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती वेगाने होऊ लागली.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा करीत असताना या राज्यातील एकूण विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणे इष्ट ठरेल . प्रत्यक्ष महाराष्ट्राची प्रगती पाहण्यापूर्वी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणे जरूर आहे. तो असा की, मध्यवर्ती शासनाच्या नियंत्रणखाली असणाऱ्या अनेक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे ही भारताच्या निरनिराळ्या घटक राज्यांमध्ये पसरली आहेत. याचा अर्थ असा नव्हे के घटक राज्यातील प्रगती भारताची नाही. परंतु घटक राज्यामधील कार्य प्रामुख्याने स्थानिक परिस्थितीवर आधारलेले व तेथील एकूण समाजाला पोषक अशा प्रकारचे असते. तेव्हा या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्यातील प्रगतीपुरतेच आपले लक्ष मर्यादित ठेवणार आहोत.
महाराष्ट्र राज्य विज्ञान व तंत्र विज्ञान कक्ष
राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समितीने सर्व राज्यांना कक्ष तयार करण्यासंबंधी सूचना पाठविल्या. त्यानुसार राज्य पातळीवर विज्ञान व तंत्रज्ञान कक्ष स्थापण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागला. अशा प्रकारच्या कक्षाचे ध्येये पुढील प्रमाणे होते :
-राज्य सरकारच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी हातभार लावणे.
-राज्याला उपयोगी पडतील असे कार्यक्रम आखणे.
-राज्यच्या पंचवार्षिक योजनांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे वैज्ञानिक मूल्यमापन करणे.
-राज्य यंत्रणेच्या विविध खात्यांना व विभागांना योग्य ती माहिती पुरविणे.
-राज्यातील विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रकल्पांना योग्य त्या संशोधन संस्था, केंद्रे इत्यादी उपलब्ध करून देणे.
-मध्यवर्ती कक्षाशी सतत संपर्क ठेवून राज्यातील योजनांना योग्य तो तांत्रिक सल्ला पुरविणे.
या ध्येयांची पूर्ती करण्यासाठी शासनाच्या निरनिराळ्या खात्यांशी संपर्क साधणे, त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या योग्य त्या संशोधन संस्थाकडे सुपूर्द करणे ह्यासाठी कक्षाचे एका मंडळात रूपांतर करण्यात आले. हे मंडळ सर्वाधिकारी तत्त्वावर काम करते.
मंडळाच्या स्थापनेपूर्वी कक्षामार्फत जे जे प्रकल्प सुरू करण्यात आले त्यांच्या संबंधीची माहिती घेणे आवश्यक आहे. या संशोधनामुळेच महाराष्ट्रातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती लक्षात येईल.
शेती
१. महाराष्ट्रातील शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले. राज्यातील विविध भागातील जमिनींचे नमुने गोळा करण्यात आले. या नमुन्याचे विश्लेषण करून त्यात तांबे, बोरॅक्स, जस्त, मॅंगनीज, लोखंड आणि मॉलिब्डिनम यांच्या संयुगांचे प्रमाण पाहाण्यात आले. संयुगे जमिनीत सूक्ष्म प्रमाणात असतात. परंतु ती अशाच सूक्ष्म प्रमाणात असल्याखेरीज वनस्पतींची आरोग्यपूर्ण वाढ होत नाही. या सर्वेक्षणामुळे महाराष्ट्रातल्या शेतजमिनीचा एक परिपूर्ण तत्का तयार झाला आहे. त्याशिवाय, कोणाही शेतकऱ्याला त्याच्या शेतातील मातीचे विश्लेषन करून घेण्याची सोय ठिकठिकाणी करण्यात आली आहे. शेती क्षेत्रातील हे महत्त्वाचे कार्य फक्त महाराष्ट्रातच झाले आहे हे विशेष.
डायस्कोरिआची मशागत
२. डायस्कोरिआ या नावाची एक औषधी वनस्पती आहे. ह्या वनस्पतीमधून कॉर्टिको-स्टेरॉइडे व काही संप्रेरके (हार्मोन्स)मिळतात. ही वनस्पती उत्तर हिंदुस्तानात मिळते. परंतु आता ह्या वनस्पतीची लागवड महाराष्ट्रात करण्यात यश आले आहे. राज्याच्या जंगल खात्यामार्फत डायस्कोरिआची लागवड करण्यात आली व तिचा प्रसार आता सर्व राज्यांत होऊ लागला आहे. आशी महत्त्वाची औषधी रसायने देणाऱ्या ह्या वनस्पतीचे लागवड हा प्रकल्प कक्षाने पुरा केला आहे.
३. सोनामुखीची सुधारलेली प्रत.
सोनामुखीचा उपयोग रेचक म्हणून करण्यात येतो. यातील जे कारक तत्त्व (ऍक्टिव्ह प्रिन्सिपल) आहे त्याचे प्रमाण मात्र या वनस्पतीत कमी असते. नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाकडे सोनामुखीची सुधारित प्रत तयार करण्याच्या प्रकल्प सोपविण्यात आला. या विभागाने सोनामुखीच्या बिया रुजण्यात येणारी अडचण दूर केली आहे. आता त्यापासून नव्या जाती तयार करण्यात येतील.
सागरी उत्पादने
झिंगे, खेकडे, शेवंड्या, कार्प जातीचे मासे इत्यादी सागरी प्राण्याचे संवर्धन करण्याचे प्रकल्प राज्यात काही ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्यात यश मिळत आहे.
सागरी तण-सागरकिनाऱ्यावर शैवाल (आल्गी) जातीच्या अनेक वनस्पती असतात. यांना सागरी तण असे म्हणतात. या सागरी तणांपासून अनेक प्रकारची रासयनिक द्रव्ये मिळतात. उदा. आयोडिन. कक्षाने सागर किनाऱ्यांचे सर्वेक्षण करून सागरी तणांचे संवर्धन करण्याजोगी स्थळे निवडली. त्यानुसार हिप्निया, सरगॅसम, ग्लॅसिलॅरिआ या जातींची सागरी तणे वाढविता येणे शक्य आहे असे आढळून आले. संवर्धनाचा प्रकल्प मालवण येथे कार्यन्वित झाला आहे.
पाणी योजना
महाराष्ट्रात पाण्याची टंचाई वारंवार त्रास देत असते. त्यासाठी जमिनीखालच्या पाण्याचा शोध घेणे. बंधारे बांधून पावसाचे पाणी साठविणे, इत्यादी प्रकल्प चालूच आहेत. त्याशिवाय आणखी एक प्रकल्प कक्षाने यशस्वी केला आहे. तो असा : शहरांना व गावांना पिण्याचे पाणी पुरविणारे मोठमोठाले जलाशय असतात. या जलाशयांमधील पाणी सूर्याच्या उष्णतेने वाफेच्या स्वरूपात वाया जाते. अशी वाफ फार मोठ्या प्रमाणात होत असते. तेव्हा ही वाफ होऊ नये यासाठी कक्षाने नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि राज्याचे जलसिंचन संशोधन व विकास खाते यांच्या मदतीने राज्यातील चार भिन्न प्रकृतीच्या प्रदेशातील जलाशयांवर प्रयोग केले. या जलाशयांवर अल्कॉक्झी एथेनॉल या द्रव्याचा एक अति पातळ थर पसरविला. ये रसायन विषारी नाही व त्याचा थर फाटत नाही. थरामुळे पाण्याची वाफ होणे फारच कमी होते. या प्रयोगामुळे एकूण दहालक्ष घनफूट (किंवा सुमारे ३३ हजार घन मीटर) पाणी वाचले. याचा खर्च सुमारे साडेआठ हजार रूपये असून या वाचलेल्या पाण्यावर दीड लाखरूपये किंमतीचा भाजीपाला पिकविण्यात यश आले आहे. आता ही योजना राज्यात इतरत्र राबविण्यात येणार आहे.
ऊर्जा
खनिज तेल आणि जंगले जसजशी कमी होत आहेत तसतशी ऊर्जा टंचाई वाढणार आहे. ऊर्जा देणारे नवेनवे उदगम शोधून काढणे जरूर आहे. त्यासाठी सौर ऊर्जा वापरण्याचे कार्य सुरू झाले आहे. कक्षामार्फत मुंबईतील कचऱ्यापासून कृत्रिम ज्वलन वायू निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुंबईत दररोज तीन ते साडेतीन हजार टन कचरा गोळा होतो. त्यातील काही कचरा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरला जातो. उरलेला कचरा केवळ भराव म्हणून वापरला जातो. या कचऱ्याचा अधिक चांगला उपयोग करण्यासाठी कक्षाने एक नमुना प्रकल्प हाती घेतला आहे. कचऱ्यापासून वायु तयार करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान व सामग्री मिळविण्यासाठी राज्याने काही तज्ञांना परदेशी पाठवून त्यांना प्रशिक्षित केले आहे. हे तज्ञ आता एक नवे उत्पादन केंद्र सुरू करण्यात यशस्वी झाले आहेत. सुरूवातीला रोज तीनशे टन कचऱ्याचे वायूत रूपांतर करण्यात येईल व क्रमाक्रमाने प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येईल .
औषधी रसायने
१. सदाफुली वनस्पतीत कर्करोगविरोधक गुण आहेत. या गुणांचा आधार असलेली रासयनिक द्रव्ये कोणती आहेत हे शोधण्याच्या व ती अलग करण्याच्या दृष्टीने कक्षाने काही संशोधन संस्थाकडे काम सोपविले. या वनस्पतीमधील व्हिनब्लास्टिन सल्फेट अलग करण्यात नॅशनल केमिकल लॅबोरेटोरीला यश आले आहे. आता हे औषध एका खाजगी व्यापारी संस्थेला मोठ्या प्रमाणात तयार करण्यात देण्यात आले आहे.
२. बिब्बा आपणा सर्वांना परिचित आहे. बिब्ब्यात कर्करोग विरोधक गुण आहेत. त्यातील कर्करोग निरोधक घटक अलग अलग करण्यासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालय (कॅंन्सर रीसर्च इन्स्टिट्यूट), विज्ञान संस्था, मुंबई, हाफकिन संस्था, मुंबई, आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटोरी या संस्थांची मदत घेण्यात कक्षाला यश मिळाले आहे. बिब्ब्याचा अर्क काढून त्यातून रसायने अलग करण्याच्या कामातील पाहिला टप्पा पूर्ण झाला आहे. थोड्याच दिवसात बिब्ब्यापासून कर्करोग विरोधक औषधे उपलब्ध होतील यात शंका नाही.
३. पोलाद कारखान्यातील भट्ट्यांमध्ये प्रचंड उष्णता असते. या उष्णतेला दाद न देणारे लेप भट्ट्यांच्या आतील बाजूस लावावे लागतात. असे लेप देण्यास योग्य असे अतिउष्णता सहन करणारे मॅग्नेशिआ तयार करण्यात यश आले आहे. सागर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मीठ तयार करतात. मिठागरांमधील मीठ काढून घेतल्यावर जो गाळ उरतो त्यातून मॅग्नेशिआ अलग करण्यात आला आहे. हा मॅग्नेशिआ टाटा स्टील कंपनीला पुरविण्यात आला असून त्याचे कार्य उत्तम असल्याचा निर्वाळा मिळाला आहे. अशा रीतेने आयात कराव्या लागणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकाचे उत्पादन आता भारतात होऊ लागले आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान मंडळाने विविध प्रकारचे संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्यातील काहीत यश मिळविले आहे. महाराष्ट्र राज्याचा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीचे गेल्या पंचवीस वर्षातील हे थोडेसे चित्रण आहे. यावरून वाचकांना राज्याच्या प्रगतीची कल्पना येईल.

Our Team

सोलापूर पुणे प्रवासी संघटना   अध्यक्ष Call : 97674 73255   Call : 97307 85799
सोलापुर पुणे प्रवासी संघटना   सचिव WebSite Developer please Call - 99758 78801 email - solapurpune@yahoo.com                 
Items: 1 - 2 of 2

Poll

you like our website?

Total votes: 335

Contact

अध्यक्ष - श्री संजयदादा टोणपे "हॉटेल अथर्व" टेभुर्नी रोड मु.पो: कुर्डुवाडी, तालुका:. माठा, जिल्हा .सोलापुर, पिनकोड: ४१३२०८,महाराष्ट्र(भारत)
9767473255,9730785799 solapurpune@yahoo.com
solapur pune pravasi sangatana