नयनरम्य दिघी

वडवली येथून डाव्या बाजूला दिवेआगरला व उजव्या बाजूने दिघीला असे दोन रस्ते जातात. ह्या फाट्यावरून उजव्या हाताच्या रस्त्याने दिघीकडे जाताना पुन्हा डाव्या बाजूला वेळास गावाकडे फाटा जातो. ह्या फाट्यावरून आपण वेळास गावाकडे गेल्यास पुढे अत्यंत विलोभनीय समुद्रकिनारा आहे. मात्र हे किनारे अत्यंत खडकाळ व धोकादायक आहेत. त्यामुळे पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये. अजून फारसे पर्यटक ह्या बाजूला येत नसल्याने निर्मनुष्य समुद्रतट आपल्याला पहायला मिळतील.

वेळासच्या पुढे आंदगांव आहे येथे समुद्रकिना-यावरच श्रीराम मंदिर व त्याचा परिसर पहाण्यासारखा आहे.

पुढे गेल्यावर सर्वे नावाचे गाव आहे. येथे एक लहानसा घाट रस्ता आहे. ह्या घाटातून दिसणारा समुद्राचा देखावा पहाताना आपण एखाद्या बेटावर घाट रस्त्याने चाललो आहोत असा भास होतो. चौफेर समुद्र आणि मधेच उंच डोंगरावर असलेले बेट असे सुंदर दृश्य आपल्याला इथे पहायला मिळेल. वाटेत अनेक ठिकाणी माकडांच्या टोळ्या आपल्याला साथ करतात.

घाट संपल्यावर काही अंतरावर मणेरी नावाचे सुंदर छोटेसे गाव आहे. येथे काळभैरवाचे स्वच्छ, सुंदर रेखीव मंदिर आहे. गाव डोंगर उतारावर असल्याने घरांच्या छपरांवरून डोकावणारा समुद्र अतिशय विलोभनीय दिसतो. ह्याच भागातून पुढे दिघीकडे उतार चालू होतो. येथून जंजिरा किल्ल्याचे दृश्य प्रत्येक वळणातून वेगवेगळे दिसू लागते. छायाचित्रणाची आवड असणा-या पर्यटकांना संपूर्ण दिवस फोटो काढत राहिले तरी कमीच वाटेल इतकी वेगवेगळी दृश्य येथून पहायला मिळतात. अशा ह्या सुंदर परिसरातून आपण दिघी बंदरात पोहोचतो.

वडवली फाट्यापासून वेळास, आंदगांव, दिघी अशी अत्यंत निसर्ग रम्य सहल करता येते. दिघीतून पुन्हा वडवली फाट्यावर यायला अगदी चांगला रस्ता आहे. वडवली फाट्यावर येऊन पुढे दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्‍वर अशी इतर आणखी निसर्गरम्य स्थळांकडे आपण जाऊ शकतो.

 

solapur pune pravasi sangatana