सुसंस्कृत पर्यटनाची कास धरणारे कोळथरे

 


  .

कोकणच्या भूमीला महाराष्ट्राचे नंदनवन म्हटले जाते. या कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात तर वृक्षवेलींनी नटलेले हिरवेगार डोंगर, खळाळणार्‍या नद्या, तुडूंब वाहणार्‍या खाडय़ा, नारळी-पोफळीची विस्तीर्ण बने, आंबा-काजूच्या घनदाट बागा, सौंदर्याचा साक्षात्कार घडविणारा निसर्गरम्य समुद्र किनारा व अन्य प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना अगदी मनसोक्त आनंद देतात. त्यातच आता पर्यटन विषयाच्या कक्षाही रुंदावल्या आहेत. त्यामुळे पर्यटन या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलताना पहावयास मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढत आहे. जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे, श्री क्षेत्र पावस, श्री क्षेत्र मार्लेश्वर, श्री क्षेत्र परशुराम, गणपतीपुळे पर्यटन केंद्र, कवी केशवसूत स्मारक, लोकमान्य टिळक जन्मभूमी, आरेवारे बीच, अन्य समुद्र किनारे व निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक आतूर झालेला पहावयास मिळतो. त्यातच आता नवनवीन पर्यटनस्थळे विकसित होत आहेत. त्यामध्ये दापोली तालुक्यातील सुसंस्कृत पर्यटनाचे कास धरणारे कोळथरे पर्यटनाच्या नकाशावर येऊ पाहत आहे.

दापोली या तालुका ठिकाणापासून तासाभराच्या अंतरावर कोळथरे हे गाव आहे. या गावात गेल्या चार वर्षात पर्यटकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हॉटेल, रिसॉर्ट व घरगुती खाणावळीची छोटेखानी साखळीच निर्माण झालेली पहावयास मिळत आहे. पर्यटनामुळे येथील रहिवाशांना स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे गावाचे अर्थकारणही बदलत चालले आहे. यातून येथील नागरिक सुसंस्कृत पर्यटनासाठी प्रयत्नशील आहेत.

दापोली तालुक्यात सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, फत्तेगड, पालगड, गावा हे किल्ले तर चंडिका, कडय़ावरचा गणपती, दुर्गादेवी, केशवराज, व्याघ्रेश्वर, महालक्ष्मी अशी प्राचीन मंदिरे आहेत. तसेच हर्णे, दाभोळ, बुरोंडी, ही बंदरे आणि कर्दे, मुरुड, पाळंदे, आंजर्ले, केळशी येथील शांत समुद्रकिनारे, उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझी लेणी, अंडामशीद, याकुब बाबांचा दर्गा, तामसतीर्थ अशी एकूण जवळपास ५० ते ५५ पर्यटनस्थळे आहेत.

आता कोळथरे, कर्दे, मुरुड, केळशी, लाडघर, आंजर्ले, हर्णे, उन्हवरे, पन्हाळेकाझी ही गावे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहेत. यात कोळथरे या गावाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोळथरे गावच्या ग्रामस्थांनी पर्यटनाचा आनंद लुटताना सुसंस्कृतपणा येण्यासाठी नियमावली केली आहे. ही नियमावली पर्यटकांच्या निदर्शनास आणून सुसंस्कृत पर्यटनामुळे पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहणार आहे हे पर्यटकांना समजावून सांगितले जात आहे. यामुळे भविष्यात सुरक्षिततेला महत्व देणारा पर्यटक आपसुकच कोळथरे गावाकडे वळणार आहे, हे वेगळे सांगायला नको.

 


solapur pune pravasi sangatana