किल्ले राजमाची

सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणा-या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर 'उल्हास नदीचे खोरे' म्हणून ओळखला जातो.याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते.याच 'उल्हास नदीच्या खो-यांच्या प्रदेशात मुंबईपुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे.कल्याणा नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे.या बंदरापासून बोरघाटमार्गेपुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग.जसा नाणेघाट तसा बोरघाट,त्यामुळे या मार्गावरूनही मोठा प्रमाणात वाहतूक चालत असे.या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणा-या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे.यापैकी सर्वात प्रमुख' किल्ले राजमाची.किल्ल्याचा भौगोलिक दृष्टा विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.
इतिहास :
राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे यालाच 'कोंडाणे लेणी' असे म्हणतात.ही लेणी कोंडाणा गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत.ही लेणी ख्रिस्तपूर्व दुस-या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती राजमाचीवर असणा-या सत्तेखाली झाली.यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा.राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोंकणचा दरवाजा'संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवरराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.
उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठा दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे.पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे.या परिसरात याला 'जिजाऊ कुंड 'म्हणतात या कुंडात लोक मोठा श्रध्देने सूर्यस्नान करतात.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गेराजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योधचे स्मारक ,अर्धवट तुटलेली तटबंदी,दरवाजाचे अवशेष,गणपति आणि मारुतिरायाची मूर्ती आहे.किल्ल्यावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला 'उधेवाडी' असे म्हणतात. उदयसागर तलाव : पावसाळयात हा तलाव मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते.पावसाळयात दरीतून पडणा-या धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते.हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोळणारा पाऊस या अल्हाददायक वातावरणामुळे मनोन्मनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात , पलिकडे खळाळे निर्मळ निळसर पाणी उत्तुंग तरुंची उभी सभोती श्रेणी एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणा-या या बालेकिल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे.किल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाडांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो. श्रीवर्धन : राजमाचीच्या असणा-या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला.श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही ब-यापैकी सुस्थितीत आहे.किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते.दरवाजाची कमान ब-यापैंकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेक-यांच्या देवडा आहेत.किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत .या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे.बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे.समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोटाचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो. शंकराचे मंदिर : तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे.या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यामध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावक-यांनी हाती घेतलेले आहे.राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते.या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते.या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला 'भैरव डोंगर' म्हणतात.अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन .बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात.श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखलपट्टी आहे,यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे.येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.
गडावर जाण्याच्या वाटा :
लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गेः लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गेराजमाची गावात यावे. ही वाट एकदंर १९ कि.मी ची आहे.वाटेने किल्ल्यावर जाण्यास ५ तास लागतात.कर्जतहून कोंदीवडे मार्गेः कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे.इथून गडावर जाण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात
राहण्याची सोय :
१. उधेवाडी गावात राहण्याची उत्तम सोय होते. भैरवनाथाच्याच्या मंदीरातही आणि बालेकिल्ल्यावर जातांना लागणा-या गुहेतही राहाता येते.
२. राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने बांधलेल्या खोल्यांमध्येही रहाण्याची व्यवस्था होते.
जेवणाची सोय : राजमाची गावात जेवणाची उत्तम सोय होते.
पाण्याची सोय : राजमाची गावात पाण्याची सोय होते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : तुंगार्ली मार्गे५ तास, कर्जत - कोंदिवडे मार्गे२ तास

solapur pune pravasi sangatana